न्यूज पीसीएमसी नेटवर्क
खेड (दि. २४ जानेवारी २०२५) :- आंबेगाव तालुक्यातील माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली.
विकास किसनराव बाणखेले (वय ५२, रा. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास बाणखेले गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाटी बाहेर पडले. त्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात मित्रांना भेटले. मित्रांबरोबर गप्पा मारुन ते घरी गेले. खोलीत गेल्यानंतर ते बाहेर आले नाहीत. त्यांचे मोठे भाऊ रामदास यांनी त्यांना जेवण करण्यासाठी हाक मारली. मात्र ते खोलीतून बाहेर आले नाही. त्यामुळे त्यांना संशय आला. खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा विकास यांनी वायरच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
या घटनेची माहिती बाणखेले कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. बाणखेले यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी किंवा मोबाइलवरुन कोणाला संदेश पाठविला नव्हता. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.















