- आकुर्डी आणि रहाटणीत आग लागून मालमत्तेचे मोठे नुकसान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२५) :- पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी (दि. २७) एकाच दिवशी रहाटणी येथील शिवार चौकातील रॉयल अव्हेन्यू या इमारतीत रात्री पावणेदोनच्या सुमारास तर, आकुर्डी येथील मुंबई-पुणे महामार्गावरील तपस्वी प्लाझा या इमारतीजवळ दुपारच्या सुमारास आग लागून मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
आकुर्डी येथे मुंबई-पुणे महामार्गावरील तपस्वी प्लाझा या इमारतीजवळ दोन दुकाने होती. या दुकानांमध्ये सोमवारी दुपारी अचानक आग लागली. यात एक झेरॉक्सचे दुकान असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या झेरॉक्स दुकानाला लागून असलेल्या एका दुकानातील साहित्य देखील आगीत खाक झाले. आगीत जिवीत हानी झाली नाही. तसेच आगीचे कारण समजू शकलेले नाही.
रहाटणी येथील शिवार चौकातील रॉयल अव्हेन्यू या इमारतीत सोमवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास अचानक आग लागून कापड दुकान आणि डेंटल क्लिनिकमधील साहित्य खाक झाले. या भीषण आगीत एक कोटी १५ लाखांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन्ही ठिकाणच्या आगीवर नियंत्रण मिळवले.











