न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२५) :- शहरामध्ये गुलेन-बॅरै सिंड्रोम (जीबीएस) या आजाराची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता दूषित पाण्याद्वारे या आजाराचा प्रसार होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शहरातील खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या तसेच पिण्याचे पाणी जारद्वारे वितरित करणाऱ्या पाणी नमुन्यांची तपासणी करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी सोमवारी (दि. २७) दिले.
त्यांनी वैद्यकीय आणि पाणीपुरवठा विभागाची संयुक्त बैठक घेऊन आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या आढावा या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी, चीफ केमिस्ट डॉ. प्रशांत जगताप व विशेष अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते.











