न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 29 जानेवारी 2025) :- शहरातील नादुरुस्त, वापरात नसलेल्या, मोडकळीस आलेल्या सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार त्यातील काही शौचालये पूर्णपणे पाडण्यात येणार आहेत. त्या जागी नवीन शौचालयाची उभारणी किंवा इतर कारणांसाठी त्याचा वापर केला जाणार आहे.
शहरातील अनेक भागांत सार्वजनिक व सामुदायिक शौचालय आहेत. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत त्या शौचालयाची नोंद करण्यात आली आहे. नादुरुस्त आणि वापरात नसलेले शौचालय पाडण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी आरोग्य विभागास दिले होते.
स्वच्छ सर्वेक्षणात ओडीएफ, ओडीएफ प्लस, वॉटर प्लस याकरिता सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांच्या स्वच्छतेची पाहणी करून गुण दिले जातात. शहरातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांपैकी काही शौचालये सिटी प्रोफाईलमध्ये नोंदविण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील जी शौचालय अजिबातच वापरात नाहीत, त्याची दुरवस्था झाली आहे किंवा मोडकळीस आली आहेत. ती शौचालये पाडण्यात येणार आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाने संपूर्ण शहरात सर्वेक्षण केले आहे.
त्यानुसार अशी शौचालये पूर्णपणे पाडण्यात येणार आहे. त्या जागी नव्याने शौचालय बांधण्यात येणार आहे. काही ठिकाणी आरोग्य कार्यालय, आरोग्य कोठी, जिजाऊ क्लिनिक, भाजी मंडईचा विस्तार, वाहनतळ आदींची उभारणी केली जाणार आहे. तर काही जागा या अग्निशमन दल, खासगी मालकीच्या किंवा ट्रस्टच्या आहेत. मुख्य आरोग्य विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रस्तावाला आयुक्त सिंह यांनी मंजुरी दिली आहे. ते काम महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.











