- आकाशचिन्ह विभागाचा सतर्कतेचा इशारा; अन्यथा फौजदारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 29 जानेवारी 2025) :- पिंपरी-चिंचवड शहरात अनाधिकृत जाहिरात फलक लावण्याचे फॅड काही कमी होताना दिसत नाही. नियम पायदळी तुडवून वर्दळीच्या ठिकाणी तसेच महत्वाच्या जागेत अनाधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स लावले जात असल्यामुळे पिंपरी-चिंचवड या स्मार्ट सिटीचे सौंदर्य टिकवून ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील तीन महिन्यांत अनाधिकृत ४० जाहिरात फलकांवर कारवाई करुन सुमारे ३ लाख ३० हजार एवढा दंड आकारण्यात आला आहे. काहींवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल केले, तरी अनाधिकृत जाहिरात फलकांचे पेव काही केल्या कमी होताना दिसत नाही.
पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत तत्कालीन सत्ताधा-यांनी तसेच प्रशासकाने शहराचा रचनात्मक विकास केला आहे. अशा रचनात्मक शहरातील सार्वजनिक ठिकाणी महापालिकेची परवानगी न घेता जाहिरात केली जाते. बाजारपेठा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे, बस स्थानके, महत्वाचे चौक अशा ठिकाणी जाहिरातीचे बॅनर्स लावले जातात. एखादा नेता शहरात आल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी किंबहुना समाधानासाठी पालिकेची परवानगी न घेता होर्डिंग्ज, बॅनर्स, किऑक्स जागा मिळेल तिथे लटकवले जातात. अशा जाहिरातींमुळे शहराच्या सौंदऱ्याला बाधा पोहोचत आहे.
जाहिरात फलक लावण्यासाठी पूर्वी महापालिकेकडून तात्पुरता जाहिरात परवाना देण्यात येत होता. परंतु, जाहिरातबाजांकडून एकच परवाना घेऊन अनेक ठिकाणी जाहिरात फलक लावले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेच्या आकाश चिन्ह परवाना विभागाने तात्पुरता जाहिरात परवाना देणे बंद केले. त्यानंतर अनाधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, किऑक्सवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिमेंतर्गत कारवाईला सुरुवात करण्यात आली. नोव्हेंबर २०२४ ते आजअखेर तब्बल ४० हजार अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली. तर, ३ लाख ३० हजार एवढा दंड आकारण्यात आला. चार जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. पुढे कारवाई होते आणि मागे अनधिकृत जाहिरात फलक लावले जातात.
शहराचे सौंदर्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नागरिकांनी आपले शहर म्हणून शहरातील नियोजनाचा बारकाईने विचार करावा. ज्यांना जाहिरात फलक लावायचे आहेत, त्यांनी महापालिकेकडून रीतसर परवाने घ्यावेत. विनापरवाना जाहिरात फलक लावल्यास दंडात्मक कारवाईसह त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. त्याचबरोबर अनाधिकृत जाहिरात फलक निदर्शनास येताच त्याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या हेल्पलाइनवर तक्रार करावी.
– डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आकाशचिन्ह परवाना विभाग…

















