- पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचा महापालिकेला इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२५) :- कुदळवाडी परिसरातील भंगार दुकाने, गोदामे, हॉटेल्स, वर्कशॉप्स, बेकरी अशी अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेडमधील तब्बल ५ हजार आस्थापनांना पिंपरी-चिंचवड महापालिकेने नोटीस बजावल्या आहेत. संबंधितांनी अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेडस् तातडीने काढून न टाकल्यास महापालिकेकडून ती पाडण्यात येतील, असे नोटीशीव्दारे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी बजावले आहे.
महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाने कुदळवाडी परिसरात ३ हजार ५०० व्यावसायिक आस्थापनांना नोटीसा बजावल्या आहेत. तसेच, फ क्षेत्रीय कार्यालयाने कुदळवाडी परिसरातील तब्बल १ हजार ५०० अनधिकृत व्यावसायिक आस्थापनांना नोटीसा दिल्या आहेत.
दरम्यान औद्योगिक परिसरातील लघुउद्योजकांना १५ दिवसांत बांधकामे काढून घेण्याविषयी कळविण्यात आले. यामुळे लघुउद्योजकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. उद्योजक मालमत्ता कर भरतात. शुल्क आकारून बांधकाम नियमित करावे. प्रशासनाने असंवेदनशीलपणे वागू नये. लघुउद्योगांवर कारवाई केल्यास एमआयडीसी बंद केली जाईल, असा इशारा पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिला आहे.

















