- मुंबई आणि पुणे बाजूकडील वाहतुकीत मोठे बदल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२५) :- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे (ता.मावळ,जि.पुणे) येथील स्टेडियमवर शुक्रवारी (दि.३१) सायंकाळी ७ वाजता भारत आणि इंग्लंड संघात होत असलेल्या टी-२० श्रृंखलेतील चौथ्या क्रिकेट सामन्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातर्फे तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक विभागाकडून देखील स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.
स्टेडियमच्या ठिकाणी २ पोलीस उपायुक्त, ३ सहायक पोलीस आयुक्त, २० पोलीस निरीक्षक, ५५ पोलीस उपनिरीक्षकांसह साडेचारशेहून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर तैनात करण्यात आले आहेत. सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर येणा-या क्रिकेट प्रेमींच्या वाहनांच्या पार्किंगसाठी १२ स्लाॅट उपलब्ध करण्यात आलेले आहेत.कुणीही थेट स्टेडियमच्या ठिकाणी कोणतेही वाहन घेऊन न येता नेमून दिलेल्या ठिकाणीच वाहनांचे पार्किंग करावे.पाणी बाटल्या, कापडी फलक, पिशव्या,पर्स अशा कोणत्याही वस्तू स्टेडियमवर घेऊन येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. क्रिकेट प्रेमींनी नियमांचे पालन करुन सामन्यांचा आनंद घ्यावा असे आवाहन तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावर यांनी केले आहे.
दरम्यान भारत विरुद्ध इंग्लंड चौथा टी २० क्रिकेट सामना ३१ जानेवारी रोजी गहुंजे येथे होणार आहे. गहुंजे परिसरातील वाहतुकीत बदल केला आहे. अत्यावश्यक सेवा असा वाहनाचा पास असलेल्या वाहनांना स्टेडियमकडे जाताना द्रुतगती महामार्गाच्या उजव्या बाजूच्या सेवा मार्गाचा पर्याय दिला आहे.
मुंबईहून येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी मार्ग :-
- देहूरोड एक्झिटमधून डावीकडे वळावे, त्यानंतर तत्काळ परत डावीकडे वळून मामुर्डी गावाच्या बाजूस असलेल्या सेवा रस्त्याने जावे.
- द्रुतगती मार्गावरून येणारी वाहने किवळे पुलावरून मुकाई चौक येथून यू टर्न घेऊन कृष्णा चौकमार्गे सिम्बॉयसीस कॉलेजच्या बाजूकडील सेवा रस्त्याने स्टेडियमकडे व पार्किंगकडे जाणाऱ्या मार्गाने जातील.
- शितलादेवी मंदिर येथून डाव्या बाजूस वळवून लेखा फार्ममार्गे असलेल्या सेवा रस्त्याने स्टेडियमकडे पार्किंगकडे जावे.
- सेंट्रल चौक मार्गे ४ मुकाई चौकात येणारी वाहने किवळे पुलाखालून मामुर्डी अंडरपासच्या डाव्या बाजूने अथवा एमएच ०४ बोगद्यातून डावीकडे वळून कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शविलेल्या पार्किंगकडे जातील.
- जुना मुंबई – पुणे महामार्गाने येणारी वाहने सोमाटणे फाटा, सेंट्रल चौकमार्गे बंगळुरू महामार्गावरील मामुर्डी जकात नाकाजवळील अंडर पास व रस्त्याने येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांना शितलादेवी मंदिर येथून मामुर्डी गावात येण्यास बंदी आहे
पुणे बाजूकडून येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी मार्ग :-
- पुणे-बंगळुरू महामार्गावरून पवना नदी पूल, हॉटेल सॅन्टोसा पास करून किवळे पुलावरून वाहने डाव्या बाजूकडे वळवायची व २०० मीटरवरून द्रुतगती मार्गाच्या डाव्या बाजूच्या सेवा रस्त्याने स्टेडियमकडे व पार्किंगकडे जावे.
- निगडी, हँगिंग ब्रिजकडून येणाऱ्या प्रेक्षकांची वाहने रावेत चौक, भोंडवे चौक, मुकाई चौकमार्गे कृष्णा चौक येथून उजव्या बाजूस वळून परत द्रुतगतीमार्गापासून बाजूस वळून सेवा डाव्या रस्त्याने स्टेडियमकडे व पार्किंगकडे जावे. वाहनचालकांनी पर्यायी मार्ग वापरावा.
- गहुंजे पूल ते वाय जंक्शनमार्गे स्टेडियमकडे फक्त कार पासधारक वाहनांना तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रवेश देण्यात येईल. त्या मार्गाने वाहन चालकांनी जावे. गहुंजे येथील क्रिकेट सामन्यासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.











