न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी (दि. ०३ फेब्रुवारी २०२५) :- रिक्षा चालकाने दारू पिऊन वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत निष्काळजीपणाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रिक्षा चालवली. तसेच रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना कट मारला. बेधुंद अवस्थेत रिक्षा चालवल्याने रिक्षा रस्त्यावरच पलटी झाली. त्या अपघातामध्ये रिक्षातील तिघेजण बाहेर फेकले गेले. तसेच रिक्षात असणारे सामान देखील रिक्षातून बाहेर पडले.
यात दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर बिर्ला हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. तसेच रिक्षा चालक रोहन गाडे हा अपघातस्थळी जागेवरच मयत झाला आहे. तसेच रिक्षातील सुनील हा उपचारादरम्यान मयत झालेला आहे.
ही घटना मरकळ येथील कार्पोरेशन बँक परिसरातील रस्त्यावर शुक्रवारी घडली आहे. याप्रकरणी सोळा वर्षीय तरुणाने मयत आरोपी रोहन गाडे (वय वर्ष २२, राहणार निगडी) याच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक खडके हे करीत आहेत.











