- जत्रेतील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे पालिकेसमोर मोठे आव्हान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२५) :- गुईलेन बॅरी सिंड्रोम (Guillain barre syndrome) या मेंदू विषयक आजाराने गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात चिंतेचे वातावरण पसरवले आहेत. अशुद्ध पाण्यामुळे हा आजार फोफावला आहे. दुसरीकडे वैद्यकीय विभागाने राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालाच्या आधारे शहरात अनेक ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले आहे. तर, पाणीपुरवठा विभाग मात्र, शहरात पुरवठा करीत असलेले कुठलेही पाणी दूषित नसल्याच्या दाव्यावर ठाम आहे.
अशातच पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून महापालिकेच्या वतीने २१ ते २४ फेब्रुवारी असे चार दिवस पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही जत्रा सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे होणार आहे.
महापालिकेच्या समाजविकास विभागामार्फत दरवर्षी पवनाथडी जत्रा आयोजित केली जाते. त्याला शहरातून विक्रमी प्रतिसाद मिळतो. शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांना मार्केटिंग कौशल्ये ज्ञात व्हावीत, महिला उद्योजिका तयार व्हाव्यात या हेतूने हा उपक्रम आयोजित केला जातो. दरवर्षीप्रमाणे ही जत्रा सांगवी येथे भरणार आहे. या जत्रेस मोठ्या संख्येने शहरासह जिल्ह्यातील नागरिक देखील भेटी देत असतात. त्यामुळे महापालिकेसमोर इतक्या मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे मोठे आव्हान आहे.
‘गुईलेन बॅरी सिंड्रोम’ हा संसर्गजन्य आजार नाही. इथे येणाऱ्या नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यास महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग सज्ज आहे. त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही.
– तानाजी नरळे, सहायक आयुक्त – समाज विकास विभाग मनपा…











