- न्यायालयाने व्यावसायिकांची याचिका फेटाळली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२५) :- महापालिकेच्या वतीने चिखली येथील कुदळवाडी व जाधववाडी परिसरातील अनधिकृत बांधकाम व पत्राशेडवर कारवाई केली जात आहे. कारवाईच्या विरोधात तेथील व्यावसायिकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने सोमवारी (दि. ६) फेटाळली आहे. त्यामुळे महापालिकेकडून धडक कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे.
येथील भंगार दुकाने व गोदामामुळे मोठ्या प्रमाणात वायू, ध्वनी व जल प्रदूषण होत आहे. तसेच, वारंवार होणाऱ्या आगीच्या घटनेमुळे जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेने येथील तब्बल ५ हजार भंगार दुकाने व गोदामे तसेच, वेगवेगळ्या आस्थापनांना महापालिकेच्या क आणि फ क्षेत्रीय कार्यालयाने नोटीस बजावली होती. व्यावसायिकांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत बांधकामे व पत्राशेड काढून घेण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली. शुक्रवारी (दि.७) पासून सरसकट कारवाई केली जाणार आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईच्या विरोधात काही व्यावसायिकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. त्यात ती याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेस अनधिकृत बांधकाम व पत्राशेडवर विनाअडथळा कारवाई करता येणार आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर यांनी सांगितले.











