न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी जाधववाडी चिखली येथील एमएनजीएल पंपासमोर आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस आयुक्त कार्यालय, महाळुंगे औद्योगिक पोलीस संकुल व पोलीस विश्रामगृह, देहुरोड या इमारतींचा भुमीपुजन सोहळा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार महेश लांडगे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
गट नं. ५३९ चिखली येथे ३.३९ हेक्टर जागेचा आराखडा व अंदाजपत्रक तयार करुन त्यानुसार नवीन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाची इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १८०.६२ कोटी रु. खर्च येणार आहे. या इमारतीमध्ये विशेष शाखा, गुन्हे शाखा, अर्ज शाखा, एमओबी-पीसीबी शाखा, एफआरओ शाखा, महिला सहायक कक्ष, जेष्ठ नागरीक कक्ष, वायरेलस, नियंत्रण कक्ष, वॉर रुम, सीसीटीव्ही रुम, सोशल मिडीया लंब, कॅन्टीन, जिम, टीएडब्ल्यु, एटीबी, एएचटीयु गुन्हे शाखा, पासपोर्ट व व्हेरीफिकेशन, लेखा शाखा, कॉन्फरन्स हॉल, प्रेसरुम अशी कार्यालये असणार आहेत. ही इमारत पर्यावरणपुरक व अत्याधनिक असणार आहे.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयासाठी लाखो वारकरी येत असतात. त्यांच्या बंदोबस्ताकरिता बाहेरुन येणारे पोलीस अधिकारी व अंमलदारांकरिता निवासस्थानाची सोय व्हावी, यासाठी देहुरोड पोलीस ठाणे येथे असणाऱ्या पोलीस विभागाच्या जागेवर देहु तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत विश्रामगृह बांधणेसाठी ११ कोटी निधी मंजूर झाला आहे.
महाळुंगे औद्योगिक पोलीस संकुल तयार करण्यासाठी प्लॉट नं पी-११, फेजर, एच पो चौक, खालुंब्रे, ता.खेड जि. पुणे येथील २० गुंठे जागा ताब्यात घेवुन त्या जागेचा आराखडा तयार करुन त्यासाठी लागणारी अंदाजीत खर्च १८.६६ कोटी रुपये चाकण इंडस्ट्रीयल असोशिएशन मार्फत सीएसआर फंडातुन निधी मंजुर करुन वाग्मी फांऊडेशनच्या मदतीने प्रकल्प राबविला जात आहे.
तसेच सद्यस्थितीतील प्रेमलोक पार्क, चिंचवड येथील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय मधील शिवनेरी सभागृहाचे उद्घाटन व उपरोक्त तीनही कार्यालयाचा भूमीपुजन सोहळा नुकताच संपन्न झाला आहे.