न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूरोड (दि. १७ मे २०१९) :- किवळे परिसरातील आदर्शनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. या भिंतीलगत आपल्या दीड वर्षाच्या मुलाला शेजारी बसवून काम करणारी गरोदर मजूर महिला व बालक या ढिगा-याखाली सापडून गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मुन्नी संतोष राठोड (अंदाजे वय ३०) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. बालकाचे नाव समजू शकले नाही. किवळे परिसरातील आदर्शनगर येथे मैथिली एम्पायर या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत हा अपघात घडला. जखमींना प्रथम देहरोड, किवळे येथील खासगी रूग्णालयात व नंतर पिंपरी येथील वायसीएम रूग्णालयात हलविण्यात आले.
देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता. जखमी महिलेची प्रकृती नाजूक असल्याचे तिच्यावर प्रथम उपचार करणारे डॉक्टर डॉ. गणेश राऊत यांनी सांगितले.











