न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०१९) :- उद्यमनगर येथील एसआरए प्रकल्पास विरोध करुन जातियवाद करणाऱ्या माजी नगरसेवक अर्जुन ठाकरे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांच्यावर जातीय प्रतिबंधक कायदा (ॲक्ट्रॉसिटी ॲक्ट) नुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी बहुजन सम्राट सेनेचे संस्थापक व अध्यक्ष संतोष निसर्गंध यांनी मुख्यमंत्री फडणवीस व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पज्ञनाभन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यशवंतनगर येथील रहिवाशांसाठी (गोरगरीबांसाठी) एसआरए योजनेअंतर्गत पक्क्या इमारती बांधण्याचे काम मासुळकर कॉलनी येथील उद्यमनगर ठिकाणी चालू आहे. सदर कामास तेथील स्थानिक माजी नगरसेवक अर्जुन ठाकरे यांनी विरोध दर्शविला असून, त्याच्या निषेधार्थ मंगळवार (दि १४/ ५ / २०१९) रोजी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. सदर मोर्चाच्या ठिकाणी प्रसिद्धी माध्यमाच्या एका वाहिनीशी बोलताना ”येथील आमच्या सारख्या चांगल्या लोकांच्या ठिकाणी असली लोक आली तर, आमची शांतता भंग होऊ शकेल”, असे वक्तव्य करुन एकप्रकारे मागासवर्गीयांच्या बद्दल असलेला द्वेष त्यांनी व्यक्त केला व आमच्या सरकारमान्य योजनेस अडथळा आणून जातीयवाद केला आहे. त्याच ठिकाणी महापालिकेतील अधिकारी राजन पाटील यांनी ठाकरे यांच्या सुरात सूर घालून योजना बंद करुन जातीयवादाला खतपाणी घातले आहे व सरकारी धोरणांची खिल्ली उडवली आहे.
यामुळे तमाम महाराष्ट्रातील तमाम मागासवर्गीय बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आपणास विनंती करण्यात येते की, सदर दोन्ही व्यक्तींवर जातिप्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन, त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. अन्यथा सर्व सामाजिक संघटनांना एकत्र घेवून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर बहुजन सम्राट सेनेचे संस्थापक व अध्यक्ष संतोष निसर्गंध, श्रीधर काळे संस्थापक व अध्यक्ष म. फुले विकास संस्था, शिवशंकर उबाळे संस्थापक व अध्यक्ष भिमशाही युवा संघटना, अशोक डोंगरे पिं. चिं. शहराध्यक्ष बहुजन सम्राट सेना यांच्या साह्य आहेत.











