न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२५) :- भोसरीतील पांजरपोळ चौकात ट्रॅफिक वॉर्डन हे त्यांचे कर्तव्य बजावत होते. त्यादरम्यान सिग्नल तोडून बोलोरो पिकपवरील वाहन चालकाने त्याचे वाहन सिग्नलला न थांबवता तसेच पुढे चालवले. ट्रॅफिक वॉर्डनने त्यास वाहन थांबवण्याचा इशारा केला. परंतु इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत चक्क ट्राफिक वॉर्डनच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. जीव वाचविण्यासाठी वार्डन यांनी वाहनाच्या बोनेटवर उडी मारली.
गाडी थांबवण्याची विनंती केली तरी देखील आरोपी चालकाने वाहन तसेच पुढे दामटले. त्यामुळे वार्डन जखमी झाले. हा प्रकार (दि. १३) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भोसरीतील पांजरपोळ चौक येथील सार्वजनिक रस्त्यावर घडला आहे.
याप्रकरणी ट्रॅफिक वॉर्डन वाघंबर कांबळे यांनी आरोपी वाहनचालक आयान पटेल (वय २१ वर्ष, रा. भोसरी) याच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. पोलिसांनी वाहन चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चिटमपल्ले हे करीत आहेत.











