न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘प्रॉपर्टी टॅक्स इम्प्रोव्हमेंट प्रोग्राम’ (Property Tax Improvement Program) या प्रकल्पास ‘नेट ॲप’ (Net App)कडून मिळालेला इनोव्हेशन ॲवॉर्ड, इम्पॉवरिंग बिझनेसेस थ्रू डेटा (Innovation Award, Empowering Businesses Through Data) हा ‘सार्वजनिक सेवामध्ये नाविन्यता’ या श्रेणीमध्ये पुरस्कार प्राप्त झाला.
हा पुरस्कार अंधेरी, मुंबई येथील जे. डब्ल्यू. मॅरियट सहार येथे १८ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू जॉंटी ऱ्होड्स यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी ‘नेट ॲप’चे कार्यकारी संचालक व उपाध्यक्ष पुनीत गुप्ता व ‘नेट ॲप’चे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक क्रिश वितलदेवरा व विविध पुरस्कारार्थी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अधिकारी आदी उपस्थित होते.
“पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने करसंकलनामध्ये वाढ होण्यासाठी व विभागाच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा आणण्यासाठी ‘प्रॉपर्टी टॅक्स इम्प्रोव्हमेंट प्रोग्राम’ (Property Tax Improvement Program) या प्रकल्पाचा अवलंब केला. या माध्यमातून माहितीचे विश्लेषण करून संसाधनांचे योग्य वाटप करण्यात आले. याचबरोबर प्रभावीपणे विविध अभियान राबविण्यासाठी मदत झाली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला मिळालेला ‘सार्वजनिक सेवामध्ये नाविन्यता’ श्रेणीतील ‘इनोव्हेशन ॲवॉर्ड’ हा पुरस्कार ही गौरवाची बाब आहे. आता यापुढे महानगरपालिकेच्या सर्व विभागामध्ये माहितीचे विश्लेषणाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सर्व विभागामधील प्रशासकिय कामामध्ये सुलभता निर्माण होऊन नागरिकांना सेवा देण्याची प्रक्रिया गतिमान होण्यास मदत होणार आहे.”
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका











