- पुणे-नाशिक महामार्गावरील हृदयद्रावक घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २२ फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये अपघाताच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. शहरातील उपनगर आणि महामार्गावर अपघाताच्या घटना सर्सास घडत आहेत. वाहन चालकांच्या चुकीमुळे अनेकांचे जीव भर रस्त्यातच जात आहेत. वाहतूक यंत्रणा कितीही सक्षम करण्याचा प्रयत्न केला तरीही, या अपघाताला आळा घालण्यात सध्या तरी, प्रशासनाला अपयश येताना दिसत आहे.
दरम्यान शुक्रवारी (दि. २१) रोजी पुणे-नाशिक महामार्गावर अशाच एका अपघातामध्ये एका महिलेचा जीव गेला आहे. ही महिला तिच्या मुलीसह दुचाकीवरून पुणे बाजूकडे जात होती. त्यादरम्यान नाशिक बाजूकडून आलेल्या टेम्पोचालकाने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत त्याचं वाहन चालवल. त्याच्या वाहनाचा धक्का दुचाकीला बसला. दुचाकीवर बसलेली तरुणाची आई या धडकेत रस्त्यावर कोसळली. तिच्या डोक्यावरून टेम्पोचे मागील चाक गेले. त्यामुळे तिच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन ती जागीच गतप्राण झाली.
हा प्रकार पुणे-नाशिक महामार्गावरील लांडगेनगर येथील मुख्य रस्त्यावर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी फिर्यादी मुलीने आरोपी वाहन चालक सुभाष नेहरे (वय ३२ वर्ष, रा. कडूस, खेड) याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवलेली आहे.
भोसरी पोलिसांनी आरोपी वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक टापरे हे करीत आहेत.


















