न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२५) :- रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांसाठी सांयकाळी लवकर सुट्टी देण्याबाबत योग्य निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड.साळवे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
रमजान महिना 2 मार्च पासून सुरू होणार आहे. या महिन्यात मुस्लिम बांधवांचे रोजे आहेत. इफ्तार करण्यासाठी त्यांना सांयकाळी लवकर घरी पोहोचणे आवश्यक असते. त्यानुसार, मुस्लीम कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाने पवित्र रमजान महिन्याच्या काळात कामकाजाच्या वेळेत योग्य सोय करणे महत्वाचे आहे.
महाराष्ट्र शासनाने याआधी इतर वेळेसदेखील विविध धर्मीय व सांस्कृतिक गोष्टींचा आदर राखून निर्णय घेतले आहेत. त्याचप्रमाणे, रमजान महिन्यात मुस्लिम कर्मचारी व विद्यार्थ्यांना सांयकाळी लवकर सुट्टी देण्याची विनंती केली जाते, ज्यामुळे ते आपल्या धार्मिक कर्तव्ये योग्य रीतीने पार पाडू शकतील.










