- ‘लोकशाही दिन’ उपक्रमात फक्त ६ तक्रारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ मार्च २०२५) :- ‘लोकशाही दिन’ उपक्रमात फक्त ६ तक्रारवजा सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासक राजवटीत पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक समाधानी आहेत काय? असा सवाल उपस्थित होत आहेत.
महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सोमवारी पार पडलेल्या लोकशाही दिन उपक्रमाचे अध्यक्ष म्हणून अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
त्यामध्ये अरूंद रस्ते रुंद करण्यात यावेत, काळेवाडी येथील तापकीर मळा चौक, राजवाडे नगर या भागातील रस्त्यांचा विकास करावा, पाण्याच्या टाकीतील पाण्याचा पाणीटंचाई असलेल्या भागात पाणीपुरवठा करावा, काळेवाडी पोलीस चौकीसमोरील महापालिका दवाखान्याचे प्रशस्त जागेत स्थलांतर करावे, लहान व्यासाच्या ड्रेनेज लाईन्स बदलून सिमेंट किंवा काँक्रीटच्या मोठ्या ड्रेनेज लाईन्स टाकाव्यात या सूचनांचा समावेश आहे.
यावेळी उपआयुक्त तथा लोकशाही दिन उपक्रम समन्वय अधिकारी राजेश आगळे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, प्रशासन अधिकारी श्रद्धा बोरडे, कार्यकारी अभियंता एस. टी. जावरानी, किरण अंदुरे, सन्मान भोसले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
लोकशाही दिनात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपली तक्रार विहित नमुन्यातील अर्जाद्वारे महानगरपालिकेकडे पाठवावी. हे अर्ज नागरी सुविधा केंद्रांमध्ये विनामूल्य उपलब्ध असून, त्यांची पूर्तता करून लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी सादर करणे आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या परिसराच्या विकासासाठी सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या समस्या व सूचना मांडून या लोकाभिमुख उपक्रमाचा लाभ घ्यावा. प्रशासन आपल्या प्रत्येक समस्येची गांभीर्याने दखल घेईल आणि त्यावर आवश्यक उपाययोजना केल्या जातील.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त (२), पिंपरी चिंचवड महानगरपालिका…

















