न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२५) :- जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमास श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, शंकर जगताप, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी दिली आहे.
सकाळी १० वाजता ह.भ.प नेहाताई भोसले साळेकर यांच्या किर्तनाने कार्यक्रमांची सुरूवात होणार आहे. त्यानंतर महिला दिनानिमित्त महिला बचत गटांचा सन्मान करण्यात येणार असून दुपारी २ ते ५ यादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.











