न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा, राडा-रोडा, प्लास्टिक, आरएमसी प्लांटमधून होणारे हवेचे प्रदूषण, बांधकामाच्या ठिकाणी होणारा कर्कश आवाज, ध्वनी प्रदूषण, घर बांधकाम करतांना घराच्या बाहेर टाकला जाणारा राडारोडा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर २४x७ करडी नजर ठेवत आहे.
त्यासाठी महानगरपालिकेने मे शुभम उद्योग प्रा. लि. व मे. सैनिक इंटलिजन्स अँड सिक्युरिटी प्रा. लि. या संस्थेची स्वतंत्रपणे नेमणूक केली आहे. पर्यावरणाची हानी करणाऱ्या कंपन्या आणि समाजकंटकांकडून ३ मार्च २०२५ पर्यंत तब्बल अडोतीस लाखांच्या जवळपास दंड वसूल केला आहे. एकूण १२२६ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
त्यात शुभम उद्योग ७४५ आणि सैनिक या ठेकेदार एजन्सीने ४८१ कारवाया केल्या आहेत. त्यांनी वसूल केलेला दंड अनुक्रमे २०,८६,३९० तर १७,१२,५७० इतका आहे.
स्थानिक नागरिक किंवा अज्ञात नागरिक रस्त्यांच्या कडेला, नदी नाले यांच्या कडेला अनधिकृत भराव व बांधकाम राडा-रोडा टाकतात. सार्वजनिक ठिकाणी घनकचरा टाकणे, परिसर अस्वच्छ ठेवणे, रस्ते पदपथावर घाण-कचरा करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका करणे, सार्वजनिक सभा संपल्यानंतर साफसफाई न करणे, जीव वैद्यकीय घनकचरा सार्वजनिक ठिकाणी फेकणे, कचरा जाळणे, बंदी असलेल्या प्लास्टिकचा उपयोग करणे, मोकळ्या जागेवर अस्वच्छता ठेवणे, डास उत्पन्न करणाऱ्या जागा निर्माण करणे, तसेच लहान उद्योजक कारखानदार सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नाल्यात किंवा नदी पात्रात सोडतात. या सर्व कारणांमुळे महानगरपालिका परिसरात अस्वच्छता पसरते. परिणामी पर्यवरण हानी होते. नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या पुढाकारतून पर्यावरण हानी रोखण्यासाठी या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे.













