न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२५) :- प्रयत्न, त्याग आणि सातत्य या गोष्टींनी विद्यार्थी वैज्ञानिक होण्याचे स्वप्न पाहू शकतो. कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ही मेहनत सातत्याने, वारंवार करावी लागते व त्यासाठी काही प्रिय गोष्टींचा त्याग देखील करावा लागतो. प्रत्येक विद्यार्थी हा जन्मजात वैज्ञानिक असतो. पालक म्हणून आपण मुलांच्या प्रश्नांवर, त्यांच्या कृतींवर ओरडा न देता, त्यांच्या या प्रयोगशील कृतीला विज्ञानाची जोड दिली पाहिजे असे ठाम प्रतिपादन शास्त्रज्ञ डॉ. सतीश राव यांनी केले.
श्रीक्षेत्र देहू येथे सृजन फाउंडेशनचे अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल व इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. ८ मार्च २०२५ रोजी शाळेच्या प्रांगणात ‘रोबोटिक्स, अंतराळ व तंत्रज्ञान प्रदर्शन’ भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन अहमदाबाद येथील स्पेस ॲप्लिकेशन सेंटर येथील वैज्ञानिक श्री. सतिश राव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इस्त्रो स्पेस टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. अरविंद शाळीग्राम, पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. भरत कानगुडे, सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयचे प्रोफेसर डॉ. सतिश एकार, आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. पी. एस. तांबडे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी उपस्थित पालक व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधताना वैज्ञानिक श्री. सतिश राव यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण तीन गोष्टी सांगितल्या. यामध्ये प्रयत्न, त्याग आणि सातत्य या गोष्टींनी विद्यार्थी वैज्ञानिक होण्याचे स्वप्न पाहू शकतो. यावेळी त्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची उदाहरणे सांगून पालकांना तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ही मेहनत सातत्याने, वारंवार करावी लागते व त्यासाठी काही प्रिय गोष्टींचा त्याग देखील करावा लागतो. प्रत्येक विद्यार्थी हा जन्मजात वैज्ञानिक असतो. पालक म्हणून आपण मुलांच्या प्रश्नांवर, त्यांच्या कृतींवर ओरडा न देता त्यांच्या या प्रयोगशील कृतीला विज्ञानाची जोड दिली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना सगळे आयते न देता पालक व शिक्षकांनी त्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण करायला हवी. एकदा त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले की विद्यार्थ्यांमधील क्षमतांचा विकास होऊन तो संबंधित विषयांत पारंगत होतो व स्वतः च्या प्रगतीचा मार्ग मोकळा करतो असे मत डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी कृतीयुक्त आनंददायी अध्यापन पद्धतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होतो हे कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मांडले. इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक संतोष पिसे यांनी यावेळी आपली भूमिका मांडली. तर सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे कौतुक केले.
इ. पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स, अंतराळ व तंत्रज्ञान या विषयांवरील प्रकल्प या प्रदर्शनात सादर केले. स्पेस, प्लॅस्टिक पुनर्वापर, चांद्रयान २ व ३, मंगलयान, गगनयान, मूव्हिंग रोबोट, रॉकेट, आर्यभट्ट, विविध अंतराळवीर अशा विविध प्रकल्पांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आला होता. यामध्ये माहितीवजा तक्ते, कार्यरत मॉडेल्स यांचा समावेश होता. विद्यार्थी आपण बनविलेल्या प्रकल्पाबाबत सर्व माहिती स्वतः स्पष्ट करून सांगत होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्राथमिक विभागातील पालकांनी एकच गर्दी केली होती. वैज्ञानिक सतिश राव सर यांचे पालकांबरोबर झालेले चर्चासत्र या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले. या चर्चासत्रात पालकांनी आपल्या शंका विचारल्या. इस्त्रो या संस्थेचा इतिहास उलगडताना होमी भाभा, विक्रम साराभाई अशा वैज्ञानिकांची उदाहरणे सांगून श्री. राव यांनी पालकांच्या सर्व शंकांचे समाधान केले. प्रदर्शन पाहताना सर्व मान्यवर, पालक यांनी प्रकल्पाशी संबंधित प्रश्न विचारुन या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद दिला. याप्रसंगी सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनिल कंद, उपाध्यक्ष अशोक कंद, शाळेच्या उपप्राचार्या शैलजा स्वामी, शिक्षकवृंद उपस्थित होते. रोबोटिक्स विभाग प्रमुख सौ. स्नेहल शिंदे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.













