न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२५) :- शहरात अन्नपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळ विरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने (एफडीए) सुरु असलेली कारवाई सध्या थंडावली आहे. त्यामुळे भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोकळे रान सापडले आहे.
आठवडाभरावर म्हणजेच १४ मार्चला होळी सण आहे. तर, ३० मार्चला गुढीपाडवा हा सण येणार आहे. तसेच, सध्या लग्नसराई सुरु आहे. त्यासाठी विविध प्रकारची मिठाई आणि अन्नपदार्थांना मागणी वाढलेली आहे. तसेच, त्यामध्ये होणारी भेसळदेखील वाढली आहे. कोणत्याही दुधाचा वापर न करता केवळ केमिकलचा वापर करुन कृत्रिम पनीर बनविणाऱ्या मांजरी खुर्द येथील गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून कारवाई केली आहे.
या कारवाईत सापडलेले तब्बल दीड हजार किलो भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले. सुमारे पावणेबारा लाख रुपयांचा भेसळीचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. ही कारवाई नुकतीच करण्यात आली. कृत्रिम दूध, दही, पनीर आणि तूप बनविणाऱ्या टोळ्या पुणे जिल्ह्यात सक्रीय आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या अन्नपदार्थांची खरेदी करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन एफडीए प्रशासनाकडून करण्यात आले आहे.













