न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२५) :- वाकड, ताथवडे, मारूंजी परिसरातील २२ हून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांचे ५०० पेक्षा जास्त रहिवासी शनिवारी (दि. ८) हवा प्रदूषणाविरोधात एकत्र आले. मूक मोर्चा काढून नागरिकांनी सिमेंट मिक्स धूळ आणि बांधकामाच्या धुळीमुळे वाढलेल्या प्रदूषणाकडे लक्ष वेधले. निरोगी पर्यावरण आमचा हक्क असून, त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली.
वाकड-ताथवडे हौसिंग सोसायटीज फोरम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा कोहिनूर कोर्टयार्ड वन सोसायटीपासून इंदिरा स्कूल मार्गे वाकडकर चौकापर्यंत नेण्यात आला. या मोर्चात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी मूक मोर्चाद्वारे पर्यावरण, प्रदूषण, नागरिकांना भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष वेधले.













