- आता धरणापासूनच थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याचं नियोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२५) :- आंद्रा धरणातून शहरासाठी दररोज शंभर दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याचा कोटा मंजूर असतानाही पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने धरणापासून थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याचे नियोजन केले आहे.
जलवाहिनी, जॅकवेल, पंप हाऊस, सब स्टेशन आदी कामांना मान्यता देण्यासाठी महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे.
धरणातून इंद्रायणी नदीत पाणी सोडले जाते. ते महापालिका निघोजे येथील बंधाऱ्यावरून उचलत आहे. मात्र, धरणातून १५० एमएलडी पाणी सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी गळती, जलप्रदूषण होत असल्याने ठरलेल्या कोट्याप्रमाणे शहराला पाणी मिळत नाही. आंद्रातून शंभर एमएलडी पाणी मंजूर असतानाही सद्य:स्थितीत ५० ते ६० एमएलडीच पाणी शहराला मिळत आहे. जलवाहिनीद्वारे पाणी आणल्यास पाणी शुद्धीकरणावरील होणाऱ्या खर्चात कपात होईल. नागरिकांना अधिक शुद्ध पाणी मिळेल. या प्रकल्पावर २०८ कोटींचा खर्च होण्याचा अंदाज आहे.
‘आंद्रा धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी पाटबंधारे विभागाला प्रस्ताव सादर केला आहे. पाटबंधारे विभाग सकारात्मक असून, त्यांच्या मान्यतेनंतर प्रत्यक्ष निविदा प्रक्रियेला सुरुवात केली जाईल’.
– अजय सूर्यवंशी, सह शहर अभियंता-पाणीपुरवठा विभाग…














