- ह.भ.प.पोपट महाराज कासारखेडकर यांचे कीर्तनसेवेतून प्रतिपादन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२५) :- क्रोधावर विजय, गाथेची महती, संतांची भक्ती विषद करत ह. भ. प. पोपट महाराज कासारखेडकर यांनी श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी (३७५) वैकुंठगमन सोहळ्यामध्ये सोमवारी सायंकाळच्या सत्रामध्ये कीर्तन सेवा सादर केली. श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे हा कीर्तन महोत्सव आणि गाथा पारायण सोहळा सुरू आहे.
क्रोधावर विजय मिळविणे म्हणजे काय, हे त्यांनी सांगितले. त्यासाठी तुकोबांच्या आयुष्यातील काही प्रसंग पोपट महाराज यांनी निरूपणातून मांडले. पंचमवेद जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील संतपर प्रकरणातील खालील अभंगावर कीर्तन केले. महाराजांनी जीवाला लाभ कसा होईल किंवा जीवाला दिशा दाखवणाऱ्या अभंगावर चिंतन केले.
पोपट महाराज कासारखेडकर म्हणाले की, सर्वसामान्य जीवाने किंवा साधकाने आपल्या जीवनात व्यर्थ गप्पा मारणे म्हणजे वाणीचा अपव्यय होय, म्हणून साधकाने गाथा वाचावी आणि आपला माथा व्यवस्थित ठेवावा.
कीर्तनाच्या प्रारंभी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांची आणि अन्य संतांची महती सांगून आपला खरा लाभ हा संतांच्या पायाजवळच आहे असे सांगितले. त्यासाठी विविध दाखले आणि दृष्टांत देऊन महाराजांनी अगदी सोप्या भाषेत अभंगाची उकल केली. गाथा मंदिर प्रतीनुसार ४०४४ अभंग आणि २९ हजार ३०० चरण गाथेत आहेत. त्यातील एक चरण जरी आचरणात आणलं तरी मरण गोड झालं असं समजावे.
जगद्गुरु तुकोबारायांनी परस्त्रीला मातेसमान मानून कामावर विजय मिळवला. छत्रपती शिवरायांचेकडून आलेला नजराणा परत पाठवून लोभावर विजय मिळवला आणि काठीने मारणाऱ्या मंबाजीबुवाला क्षमा करून क्रोधावर विजय मिळवला होता. अभंगातील तत्त्वज्ञान तुकोबारायांनी स्वतः आचरणात आणले होते. वसंत वनात आणि संत जनात या उक्तीप्रमाणे वनाची दुर्दशा वसंत ऋतू घालवतो व जनांची दुर्दशा संत घालवतात, असे पोपट महाराज यांनी निरूपणात सांगितले.
तुकोबारायांनी गाथेत सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला जीवनात लाभ हवाच असतो, परंतु खरा लाभ हा संसारात नसून परमार्थात आहे म्हणून प्रपंचाला विटावं, कुसंगतीतून सुटावं, संतांना भेटावं, आत्मधन लुटावे असे सांगून, पोपट महाराज म्हणाले – हे नाही जमले तर उखळामध्ये आपले डोके कुटावे, अशा प्रकारे विनोदाच्या अंगाने सांगून महाराजांनी संत संगतीचे महत्त्व विषद केले. .
देवाची भक्ती केली तर तो प्रसन्न केव्हा होईल हे सांगता येत नाही पण संतांच्या पायाजवळ बसले की साधक सिद्ध होऊन त्याला खरा लाभ प्राप्त होतो. आपली इच्छा सहजासहजी सुटत नाही परंतु संतांचे दास म्हणून घेतले की मनुष्याला पुढे कोणतीच इच्छा राहत नाही. निरीच्छ होणे हे अध्यात्मातील मोठी प्राप्ती असते.
इतर कोणाची कृपा होऊ न होऊ, पण संतांची कृपा होणे जीवनात खूप महत्त्वाचे असते. कारण एकदा का संत कृपा झाली, की ती कल्पंतापर्यंत संपत नाही. आणि म्हणून आपल्या हातून सदैव संत सेवा घडावी. संत सेवा ही देवालाही गोड वाटत असते, आवडत असते.
अभंगाच्या सुरुवातीला पोपट महाराजांनी सांगितले की, राष्ट्रगीत आपण म्हणतो पण त्यातील शब्दांचे अर्थ माहिती नाहीत. त्यातही गाथा हा शब्द आला आहे. पण याची दखलही आपण घेतली नाही. राष्ट्रगीत हे बंगाली भाषेतील गीत आहे. भारतमातेच्या वैभवाचं भौतिक रूपाचं वर्णन करणारा हा शब्द आहे तर आपल्याकडे भगवंताच्या स्वरूपाचे वर्णन करणारा गाथा शब्द आहे, असे सांगत त्यांनी भारतातील विविध प्रांतात वेगवेगळ्या भाषांमध्ये गाथा शब्दाचा कसा वापर झाला आहे, ते त्यांनी सांगितले.
कथेतून उलगडले तुकोबांचे चरित्र…
हभप ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) यांचे तुकोबारायंचे चरित्र कथनही काल झाले. ते म्हणाले की, तुकोबारायांच्या आठव्या पिढीतील पूर्वज विश्वंभरबाबा यांनी पांडुरंगाची भक्ती केली. निरंतर पायी वारी केली. विश्वंभर बाबा थकल्यानंतर प्रत्यक्ष भगवंताने त्यांना सांगितले – आता तुम्ही वारीला येऊ नका. मीच जोडीने तुमच्याकडे येतो.
विश्वंभर बाबांच्या स्वप्नात जाऊन देवाने सांगितले, की तुमच्या आंब्याच्या वनात मी आलो आहे. कुदळ, फावडे न वापरता हाताने उकरून तुम्ही मला जमिनीतून काढा. गावकऱ्यांच्या मदतीने विश्वंभर बाबांनी बुक्क्याने वेढलेली मूर्ती काढून टाळ मृदुंगाच्या वाद्य गजरात गावात आणली. तिची प्राणप्रतिष्ठा केली व नित्य पूजा आरंभली. त्याच वेळी तुमच्या आठव्या पिढीत मोठा भगवंत भक्त जन्माला येईल, अशी आकाशवाणी झाली. विश्वंभर बाबांनी देह ठेवल्यावर त्यांनाही न्यायला देवाने विमान पाठवले होते.
उद्याचे कार्यक्रम
१२ मार्च – हभप शिरीष महाराज मोरे (स. ११), हभप चंद्रशेखर महाराज देगलूरकर (सायं. ६) यांचे कीर्तन होणार आहे. उद्या बुधवारी (ता. १२) दिवसभरात पुणे महापालिकेतील गावे, खेड तालुका, हवेली तालुका, शिरूर तालुका, मावळ तालुका येथील विविध गावांमधून आमटी, भाकरीचा प्रसाद येणार आहे.














