न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२५) :- रावेत येथील एका महाविद्यालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल महाविद्यालय प्रशासनाला मंगळवारी (दि. ११) सकाळी साडेआठच्या सुमारास मिळाला.
त्यानंतर पोलिसांच्या बॉम्ब शोधक/नाशक पथक (बीडीडीएस) आणि श्वान पथकाच्या मदतीने संपूर्ण महाविद्यालयात पाहणी करण्यात आली. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने हा ‘ई-मेल’ खोटा असल्याचे निष्पन्न झाले.
रावेतचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा महाविद्यालयात दाखल झाला. पालक आणि विद्यार्थ्यांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणात ज्या ई-मेल अकाऊंटवरून धमकी पाठवली आहे, त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर काइम सेलकडून तपास सुरू आहे.
अशा खोट्या ई-मेल पाठवणाऱ्या व्याक्तीयर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. त्यासाठी सायबर सेलची मदत घेण्यात येत आहे.

















