न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२५) :- राज्यातील ३८८ खासगी शाळा अनधिकृतरीत्या चालवल्या जात असल्याचे असल्याची कबुली शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळात दिली.
पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील २२ अनधिकृत शाळांपैकी ११ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर उर्वरित सहा शाळांना मान्यता मिळाली असून, पाच शाळांना इरादापत्र प्राप्त झाल्याची माहितीही भुसे यांनी दिली.
विधिमंडळ अधिवेशनात राज्यातील अनधिकृत शाळांसंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नाला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले. शिक्षण आयुक्तांच्या १८ जुलै २०२३ च्या पत्रानुसार राज्यात अनधिकृत ६६१ शाळा चालवल्या जात होत्या. गेल्या दोन वर्षांत शासनाद्वारे घेतलेल्या विशेष मोहिमेद्वारे ११७ शाळा बंद करण्यात आल्या.


















