- खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १८ मार्च २०२५) :- पुणे ते लोणावळा दरम्यानची तिसरी आणि चौथी मार्गिका जमीन अधिग्रहण न झाल्याने रखडली आहे. पनवेलमध्ये देशातील सर्वात मोठे विमानतळ होत आहे. त्यामुळे कर्जत ते लोणावळा आणि लोणावळा ते पुण्यापर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम करावे. त्यामुळे पनवेल पासून थेट पुण्यापर्यंत जलद रेल्वे धावू शकतात.
दुपारी दीड वाजता लोणावळावरून पुण्याला जाणारी लोकल पुन्हा सुरू करावी. अमृत भारत योजनेत कर्जत आणि नेरळ रेल्वे स्थानकाचा समावेश करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.
केंद्र सरकारच्या २०२५-२६ या अर्थसंकल्पावरील चर्चेत खासदार श्रीरंग बारणे सहभाग घेतला. शिवसेनेच्या वतीने अर्थसंकल्पावर चर्चा केली.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड, आकुर्डी, तळेगाव दाभाडे, लोणावळा, पनवेल जंक्शनचा या योजनेअंतर्गत विकास केला जात आहे. कर्जत आणि नेरळ रेल्वे स्थानकाचा या योजनेत समावेश करावा. हा मार्ग मुंबईपासून पुण्यापर्यंत जातो. या मार्गावरून सर्वाधिक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे या योजनेत सहभागी करून घेऊन विकसित करावा. जेणेकरून प्रवाशांना सुविधा मिळतील.
अर्थसंकल्पात घोषणा केली जाते. परंतु, प्रत्यक्षात वर्षानुवर्षे काम होत नाही. जागेचे भूसंपादन होत नाही. राज्य सरकारचा प्रतिसाद मिळत नाही. मावळ लोकसभा मतदारसंघात २०१७ मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेची घोषणा केली होती. केंद्र सरकारने मंजुरी दिली. अर्थसंकल्पात त्याचा उल्लेखही केला होता. परंतु, जमीन अधिग्रहण व अन्य कारणांमुळे अद्यापही तिसरा आणि चौथा मार्ग रखडला आहे. मुंबईवरून पुण्याला जाणारा, सर्वाधिक वाहतूक असलेला हा मार्ग आहे. हा मार्ग झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. पुणे ते लोणावळा दरम्यान लोकल ट्रेन धावते. कोरोना काळात दुपारच्या वेळेत रेल्वे बंद केली होती. याबाबत अनेकदा पाठपुरावा करून बारा वाजता ट्रेन चालू केली. परंतु, दुपारी दीड वाजताची लोकल ट्रेन बंद असल्याने कामगार, महिला, विद्यार्थी विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दीड वाजता लोणावळावरून पुण्याला जाणारी लोकल पुन्हा सुरू करावी, असेही खासदार बारणे म्हणाले.
कर्जत ते लोणावळा आणि लोणावळा ते पुण्यापर्यंत तिसरी, चौथी मार्गिका करा…
पनवेल आणि कर्जतच्या दरम्यान नवीन रेल्वे मार्ग बनत आहे. हा मार्ग लवकरच पूर्ण होईल. पनवेलमध्ये देशातील सर्वात मोठे विमानतळ होत आहे. त्यामुळे कर्जत ते लोणावळा आणि लोणावळा ते पुण्यापर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम करावे. त्यामुळे पनवेल पासून थेट पुण्यापर्यंत जलद ट्रेन धावू शकतात.











