न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पिंपरी चिंचवड शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, त्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्लास्टिकमुक्त पिंपरी चिंचंवड मोहिमेचा भाग म्हणून आरोग्य विभाग “ह” क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक ३१ मधील नवी सांगवी येथील साई चौक भाजीमार्केट येथे प्लास्टिक बंदी जनजागृती उपक्रम घेण्यात आला. तसेच ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय येथील प्रभाग क्रमांक २९ मधील लक्ष्मीनगर येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपस्थित नागरिकांना झिरो प्लास्टिक, प्लास्टिक फ्री झोन, सिंगल युज प्लास्टिक, प्लास्टिकचे पर्यावरण व मानवी जीवनावर होणारे विपरीत परिणाम, याबाबत माहिती देण्यात आली. त्याचबरोबर प्लास्टिक पिशवीचा वापर टाळून कापडी पिशवीचा वापर करावा, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले याशिवाय प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
अशी आहे दंडाची तरतूद
बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर पहिल्यांदा केल्यास – ५,००० रुपये
बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर दुसऱ्यावेळी केल्यास – १०,००० रुपये
बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर तिसऱ्या वेळी केल्यास – २५,००० रुपये व ३ महिने करावास.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर पर्यावरणास हानिकारक असून त्यांच्यामुळे कचऱ्याची समस्या देखील वाढत आहे. त्यामुळे शहरातील विक्रेते व ग्राहक नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
– सचिन पवार, उप आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका











