न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२५) :- कला सादर करताना कवितायुक्त व्यक्तव्यामुळे कॉमेडियन कुणाल कामराने राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ माजवला दोन्ही आजी आणि माजी मुख्यमंत्री ह्यामुळे चांगलेच संतापले. शिवसैनिक आणि लोकप्रतिनिधी हे रस्त्यावर उतरले. सिटीझन्स च्या प्रतिक्रियांचा सोशल मीडियावर अक्षरशः पाऊस पडला, सर्वच माध्यमांचे ह्या विषयाकडे लक्ष वळाले आणि “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा” मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.
आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा ह्या विषयावर संविधान अभ्यासक डॉ. विजयकुमार पाटील यांची प्रतिक्रिया घेतली तर त्यांनी या बाबत सविस्तर सांगितले. ते म्हणाले.” भारतीय संविधानातील कलम १९(१) अ हे कलम नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देते. ज्यामुळे ते विचार आणि भावना व्यक्त करू शकतात त्यामध्ये “कला” हे सुद्धा एक माध्यम आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मुख्य आधारस्तंभ आहे. ज्यामुळे नागरिकांना त्यांचे विचार मुक्तपणे मांडता येतात. समाजातील सत्य आणि चुका ओळखण्यासाठी व दाखवण्यासाठी हे कलम महत्वाचे ठरते. त्यामुळे समाजात खरेपणाची गती वाढून प्रगती होते.
परंतु, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंशतः निर्बंध लोकशाहीतील व्यवस्था समाजहितासाठी अवलंबू शकते. सार्वजनिक शांतता भंग होत असेल. कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असेल तर काही निर्बंध प्रशासनाला लोकशाही मार्गाने घालता येतात. यासंदर्भात उदाहरण द्यायचेच म्हटले तर देशविरोधी किंवा द्वेषपूर्ण भाषण किंवा वक्तव्य केल्यास त्यावर कारवाई होऊ शकते. तिरस्कार, राग, वाईट भावना एखाद्या वक्तव्यामुळे निर्माण होत असेल तर संवैधानिक मूल्यांचा काही अंशी भंगच ठरेल.” विशेष म्हणजे जागतिक मानवाधिकार संहितेतही सदरचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कलम १९ न.वरच अधोरेखित केलेले आहे.











