न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२५) :- स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेले विषय प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी नुकत्याच झालेल्या बैठकीत ठेवण्यात आले होते. त्यास प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महापालिकेच्या प्रभाग क्र. २६ पिंपळे निलख, सर्व्हे नं. ४२, २, ५, ७ मधून जाणारा १२ मीटर रुंद डी. पी. रस्ता विकसित करणे, निसर्गकवी संत बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय याठिकाणी पांढरे उंदीर पुरविणे, भारत विकास शिक्षण संस्थेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयांची संलग्रता मिळविणे, अ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वापरात नसलेले अथवा दुरावस्थेत अथवा मोडकळीस असणारे सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांचा सर्व्हे करून निष्कासित करणे, प्रभाग क्र. १ मधील अष्टविनायक चौक परिसरातील तसेच पाटीलनगर, बागवस्ती व इतर भागातील रस्त्यांची हॉटमिक्स पद्धतीने दुरूस्ती करणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास देखील प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.











