न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवडेनगर येथे राहणारे राम चित्तमपल्ले यांचा पंधरा वर्षांचा मुलगा सुशांत जन्मतः अंध, अस्थिव्यंग व मतिमंद असतानाही पुण्यातील ससून जनरल हॉस्पिटलने या मुलाला तात्पुरता अपंगांचा दाखला देऊन अवेहलना केली आहे. प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या पिंपरी चिंचवड शहर संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांनी जन्मत: अपंग असणाऱ्या बांधवांना दिल्या जात असलेल्या तात्पुरत्या दाखल्याच्या मुद्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सुशांतला ससून रुग्णालयात २६ मार्च २००८ रोजी शंभर टक्के अपंगत्वाचे कायमस्वरूपी प्रमाणपत्र दिले होते. मात्र, ऑनलाईन प्रमाणपत्रासाठी सुशांतचे वडील २५ फेब्रुवारी २०१८ रोजी त्याला घेऊन पुन्हा ससूनला गेले. डॉक्टरांनी त्यांना अपंगत्वाचा तात्पुरता दाखला दिला. त्याची मुदत दि. १५ /०२/ २०२३ पर्यंत आहे. शासन नियमानुसार या मुलाला कायमस्वरूपी दाखला देणे आवश्यक होते.
१०० % अंध आणि मतिमंद असणाऱ्या मुलात कशी सुधारणा होईल? असा सवाल करून डॉक्टरांच्या अडमुठेपणामुळे या कुटुंबाला सतत शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले. आयुक्त, अपंग कल्याण आयुक्तालय व आरोग्य उपसंचालकांकडे दाद मागणार असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले.











