- महाळुंगे वाहतूक विभाग केवळ बघ्याच्या भूमिकेत?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ एप्रिल २०२५) :- तळेगाव चाकण महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने एचपी चौक ते महाळुंगे पोलिस ठाणे चौक, महाळुंगे पोलिस ठाणे चौक ते इंडोरन्स चौक आणि एचपी चौक ते इंडोरन्स चौक या तीनही मार्गावर एकेरी वाहतूक सुरू केली. मात्र, या मार्गावर दोन्ही बाजूला अवजड वाहने पार्किंग करत असल्याने वाहतुकीला अडथळा येत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस दोन्ही बाजूंची पार्किंग कधी काढणार, असा सवाल वाहनचालक करत आहेत.
महाळुंगे वाहतूक विभागाच्या या मार्गावरून कच्च्या आणि पक्क्या मालाच्या अवजड वाहनांचा राबता असतो. तर वाहने रस्त्याकडेलाच उभी केली जातात.
हद्दीतील पोलिस ठाणे चौक, सिग्मा सर्कल चौक, इंडोरन्स चौक, महिंद्रा सर्कल चौक, एचपी चौक या रस्त्यावरून जड-अवजड, हलकी वाहने तसेच कंपनी बसेसची मोठ्या संख्येने वर्दळ असते. महामार्ग अरुंद असून, मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होते.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. मात्र, रस्ता रुंदीकरणाचे काम केले नाही. तळेगाव-चाकण रस्त्यावर अवजड वाहने उभी केली जातात.
अनेक कंपन्यांच्या बाहेर कर्मचाऱ्यांची दुचाकी, चारचाकी वाहने पार्किंग केलेली असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. कोंडी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने प्रायोगिक तत्त्वावर तळेगाव- चाकण मार्गावर एकेरी वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोंडीला जबाबदार रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहनांची पार्किंग अजूनही ती जैसे थे असल्याचे दिसून येते. एकेरी वाहतुकीने मनःस्ताप सहन करावा लागत आहे.











