न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२५) :- आठ वर्षाच्या अपहृत मुलाची खंडणी विरोधी पथकाने रेल्वे सुरक्षा बल पोलीसांच्या मदतीने दोन तासात सुटका केली आहे. चिंचवड येथून मुलाचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी चिंचवड पोलीससात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गजानन सुपडा पानपाटील (वय २५ वर्षे, रा. पुनई, ता. मोताळा, जि. बुलढाणा) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज, आरोपीचा फोटो व संशयित इसमाचे मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण केले. संशयित इसम अपह्त मुलास घेवून रेल्वेने जात असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी तात्काळ भुसावळ पोलीस स्टेशन, रेल्वे सुरक्षा बल, सरकारी रेल्वे पोलीस, भुसावळ रेल्वे स्टेशन, मुक्ताईनगर, जळगांव, चाळीसगांव पोलीस स्टेशन यांना संपर्क करून संशयित इसम व अपहृत बालकाचे सीसीटीव्ही फुटेज, फोटो व लोकेशन त्यांना पाठवून, त्यांना समांतर तपास मदत करण्याबाबतची विनंती करुन संपर्कात राहिले होते. संशयित इसम अपह्त बालकास घेवून काशी एक्सप्रेस मध्ये बसले असल्याचे निष्पन्न झाल्याने रेल्वे सुरक्षा बल यांनी चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे संशयित इसमास ताब्यात घेवून अपह्त बालकाची सुखरुप सुटका केली. पुढील अधिक तपास चिंचवड पोलीस स्टेशन करत आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह-आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ बाळासाहेब कोपनर, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि शैलेश गायकवाड युनिट-०२ वपोनि अंकुश बांगर चिंचवड पोलीस ठाणे, वपोनि देवेंद्र चव्हाण, खंडणी विरोधी पथक तपोउपनि तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोउपनिरी सुनिल भदाणे, सपोउपनि सुनिल कानगुडे, पोलीस अंमलदार प्रदिप पोटे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, प्रदिप गोंडाबे तसेच सपोउपनि नागेश माळी (ता.वि.वि) रेल्वे सुरक्षा बल तसेच जळगाव जिल्हा पोलीस दल यांचे पथकाने केली आहे.