न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२५) :- खटला न्यायालयात न पाठवता व कोणताही दंड न भरण्यासाठी लाच घेणाऱ्या भोसरी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अंमलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (दि. ५) सकाळी करण्यात आली.
रेशमा बाळू नाईकरे (वय ३२) असे कारवाई झालेल्या महिला पोलिस अंमलदाराचे नाव आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारदार यांचा दूध विक्रीचा व्यवसाय असून, ३१ मार्चला रात्री अकराच्या सुमारास डेअरीतील दूध विक्री उशिरापर्यंत सुरु ठेवल्याने तक्रारदार यांना भोसरी पोलिस ठाण्यात आणून त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलिस अधिनियम सन १९५१ चे कलम ३३ सह १३१ अन्वये खटला भरला होता.
तो न्यायालयात न पाठवता व कोणताही दंड न भरण्यासाठी रेशमा नाईकरे यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन हजारांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून, रंगेहात पकडले.