- आंदोलनाचा इशारा देताच प्रशासन ताळ्यावर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२५) :- महापालिकेने सर्व विभागांत ई-प्रणाली सुरू केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत. तसेच काही कर्मचाऱ्यांची पगार बिले जमा करायचे राहिले आहेत. ते महापालिकेने जुन्या प्रणालीतून स्वीकारावीत, यासाठी लिपिक संवर्गीय हक्क परिषदेने शुक्रवारी (दि. ४) निषेध आंदोलन केले. प्रशासनाने दोन दिवसांत पगार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
महापालिका प्रशासनाने महापालिकेच्या सर्वच कामकाजासाठी सॅप संगणक प्रणालीचा वापर सुरू केला आहे; परंतु सुरुवातीलाच या प्रणालीमध्ये विस्कळीतपणा आल्यामुळे महापालिकेचे संगणकावर सुरू असलेले सर्वच कामकाज ठप्प पडले आहे. यामध्ये प्रामुख्याने कर्मचारी वर्गाचे मार्च महिन्यातील पगार बिलांना विलंब झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे कर्जाचे हप्ते पगाराअभावी बाउन्स झाले आहेत. यामुळे कर्मचारी वर्गामध्ये तीव्र नाराजीचा सूर होता. याबाबत महापालिकेच्या लिपिक संवर्गीय हक्क परिषदेने शुक्रवारी निषेध आंदोलन केले. तसेच पगार झाला नाही तर काम बंद करण्यात येईल, असे सांगितले. महापालिकेचे मार्च महिन्याचे पगार बिले जुन्या संगणक प्रणालीमधून स्वीकारावीत, यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.
ऑनलाइन प्रणालीमुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्वच कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांत पगार होईल, असे प्रशासन विभागप्रमुख उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी आश्वासित केल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. पगार न झाल्यास काम बंद करण्याचा कर्मचाऱ्यांकडून महापालिकेला इशारा देण्यात आला आहे.
महापालिका प्रशासनाने या आंदोलनाची व परिषदेच्या मागणीची तात्काळ दखल घेत आदेश दिला. त्यामुळे परिषदेच्या वतीने अध्यक्ष संजय जगदाळे यांनी आयुक्त शेखर सिंह व प्रशासनाचे उपआयुक्त विठ्ठल जोशी यांचे आभार मानले. यावेळी परशुराम कदम, नागेश जाधव, संजय घुले, अजय भोसले, रवि वाघेरे, विजय जाधव, निखील काळजे, ईस्माल शेख, सिध्देश्र्वर वेदपाठक, महादेव साबळे, प्रकाश निकाळजे,शाम रोकडे, नाथबाब लोखंडे, पंडीत साखरे, चंद्रकांत घारे, अविनाश इंगवले, रेखा कु-हाडे, रघुनाथ चव्हाण, तसेच लपिक संवर्गिय परिषदेचे, शिव-फुले-शाहु-आंबेडकर विचार कर्मचारी मंचाचे व शिपाई समन्वयक समिती, युवा पर्वाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.














