- लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवकांना बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ०८ एप्रिल २०२५) :- पुणे महानगर प्रादेशिक क्षेत्राचा शाश्वत दळणवळण आराखडा ठरविण्यासाठी महामेट्रोच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑटो क्लस्टर येथील सभागृहात बुधवार ९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ऑटो क्लस्टर येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये शहरातील मेट्रो, बीआरटी, बस थांबे, वाहनतळ, पूल तसेच इतर दळणवळण संबंधित प्रकल्पांचे नियोजन अशा विविध विषयावर चर्चा होणार आहे.
महामेट्रोच्या वतीने पुणे प्रादेशिक क्षेत्राकरिता प्रादेशिक शाश्वत दळणवळण विकास आरखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. या आराखड्यात शहरातील पदाधिकाऱ्यांच्या, नगरसदस्यांच्या देखील सूचना सामविष्ट करण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चा सत्रात पिंपरी चिंचवड शहरातील तसेच पुणे शहर व पुणे प्रादेशिक हद्दीतील मेट्रो, बीआरटी, बस थांबे, वाहनतळे, पूल तसेच इतर दळणवळण अशा विविध विषयांवर प्रकल्पांचे नियोजन, सूचना आणि चर्चा करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या चर्चासत्रासाठी खासदार,आमदार,महानगरपालिकेचे माजी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विविध विषय समित्यांचे सभापती अध्यक्ष तसेच माजी नगरसदस्य, नगरसदस्या यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.