न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ एप्रिल २०२५) :- विद्यार्थ्यांच्या नजरेतील विविध प्रकारचे चष्मे, भूमितीमधील वर्तूळ, चौकोन, त्रिकोण कल्पकतेने रेखाटत त्याद्वारे काढलेली विविध चित्रे, मुलांच्या कल्पनेतील उष्ण आणि शांत रंगाचे शहर, चित्रातून दाखवण्यात आलेले दयाळूपणाचे क्षण… यासह विविध विषयांवरील शाळकरी विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे पाहण्याची संधी मंगळवारी (८ एप्रिल २०२५) नागरिकांना मिळाली. निमित्त होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या चित्रांचे भरवण्यात आलेले ‘द आर्ट बॉक्स’ हे प्रदर्शन.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ३७ शाळांमधील विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे ‘द आर्ट बॉक्स’ हे चित्रकला प्रदर्शन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा थेरगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संगिता बांगर, मुख्याध्यापक श्रीकांत चौगुले यांच्यासह विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
चित्रकला प्रदर्शनामध्ये ‘आम्ही जलनिवासी-मासा’, ‘माझे विलक्षण विशेष चष्मे’, ‘रंग आव्हान’, ‘भिन्नांक कला’, ‘झेंटँगल्स’, ‘वस्त्रशिल्प-बाटीक’, ‘वर्तूळ आणि चौकन’, ‘टिट्स आणि शेड्स’, ‘ओरिगामी-पक्षी’, ‘इंद्रधनुष्य रंगांचे स्थानांतरण’, ‘शाळेच्या नावाची पाटी’, ‘हीदर गॅलरचे निसर्गचित्र’, ‘पॉल क्ले- उष्ण आणि शीत रंगाचे शहर’, ‘रेषांचा सराव’, ‘मेहंदी डिझाईन’, ‘स्थिरचित्र’, ‘वेगळेपण दाखवणे’, ‘दयाळुपणाचे क्षण’, ‘शहरी दृश्य’, ‘उष्ण-शीत रंगाच्या रेषांनी बनवलेली भूमीचित्रे’, ‘चुरगळलेल्या कागदपासून बनवलेली कला’, ‘प्रतिमा विस्तार’, ‘तुम्ही त्रिकोणापासून काय करू शकता?’ अशा विविध विषयांवरील विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे होती. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विविध शाळांतील विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.