न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२५) :- राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार शहरामध्ये अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेसाठी आवश्यक कार्यवाही सुरू झाली आहे. भोसरी परिमंडळ कार्यालयाकडून त्यासाठी मंगळवारी रास्त भाव धान्य दुकानदारांची बैठक घेऊन त्याबाबतच सूचना देण्यात आल्या. तर, बुधवारी निगडी आणि चिंचवड कार्यालयांतर्गत दुकानदारांची बैठक घेतली जाणार आहे.
राज्य सरकारने अपात्र ठरणारे लाभार्थी, दुबार रेशनकार्ड असणारे लाभार्थी तसेच मृत लाभार्थ्यांना रेशनकार्डातून वगळण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी (केशरी रेशनकार्ड) व शुभ्र रेशनकार्ड या सर्व शिधापत्रिकांची तपासणी १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ही शोध मोहीम राबविली जाणार आहे. रास्त भाव धान्य दुकानदारांमार्फत ही कार्यवाही करण्यात येणार आहे.
लाभार्थ्यांना अर्ज भरून देताना रहिवासी पुरावा (मागील वर्षभरातील) आणि उत्पन्नाचे हमीपत्र सादर करावे लागणार आहे. एप्रिल महिन्यातील धान्य वाटपाच्या वेळी लाभार्थी नागरिकांना त्यासाठी रास्त भाव धान्य दुकानांतून अर्ज दिले जाणार आहेत. त्यानंतर हे सर्व अर्ज आणि कागदपत्रे जमा करून त्याची पडताळणी केली जाणार आहे.
अपात्र रेशनकार्ड शोधण्यासाठी भोसरी परिसरातील रास्त भाव धान्य दुकानदारांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिलेल्या आहेत. धान्य वाटपावेळी लाभार्थी नागरिकांना अर्ज देऊन ते भरून घेतले जाणार आहे. त्यासोबत कागदपत्रांची पूर्तता न केल्यास शिधापत्रिका रद्द केल्या जातील.
– गजानन देशमुख, परिमंडळ अधिकारी, भोसरी…
अपात्र शिधापत्रिका शोधमोहिमेंतर्गत बुधवारी रेशन दुकानदारांची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या जाणार आहेत. नागरिकांनी वार्षिक उत्पन्नाबाबत चुकीचे हमीपत्र भरल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.
– प्रदीप डांगरे, परिमंडळ अधिकारी, निगडी शिधापत्रिका…
अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेत एका कुटुंबात दोन शिधापत्रिका असतील तर त्या रद्द होऊ शकतात. जे नागरिक धान्य घेऊन जात नाहीत त्यांच्याही शिधापत्रिका रद्द करण्याची कार्यवाही होऊ शकते. हे कामकाज रेशनकार्ड दुकानदारांकडून करून घेत असाल तर त्यांना त्याचा योग्य मोबदला द्यायला हवा.
– विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअरप्राईज शॉपकिपर्स फेडरेशन….












