- तिसरा अतिरिक्त आयुक्तही राज्य शासनाचाच…
- येताच उपायुक्तांची केबिनही बळकावली; कर्मचारी महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे धाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२५) :- महापालिकेत अतिरिक्त आयुक्त क्रमांक एक आणि दोन ही दोन पदे शासनाकडून प्रतिनियुक्तीवर नियुक्त केली जातात, तर अतिरिक्त आयुक्त क्रमांक तीनचे पद हे महापालिका आस्थापनेवरील अधिकाऱ्यांसाठी पदोन्नतीसाठी आरक्षित आहे. मात्र, त्या एकमेव जागेवरही शासनाने सांडभोर यांची प्रतिनियुक्तीवर नेमणूक केली आहे.
महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांची तीन पदे आहेत. त्यातील दोन पदे शासन प्रतिनियुक्त्तीने आणि एक पद महापालिका अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने भरले जाते. यासाठी महापालिका अधिकाऱ्यास समकक्ष पदावर १० वर्षे सेवा पूर्ण असलेला अनुभव असावा. अतिरिक्त आयुक्त क्रमांक तीनच्या पदावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचीच नियुक्ती व्हावी म्हणून अनुभवाच्या अटीत बदल करण्यात यावे, यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू होते.
दरम्यान तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदी आता राज्य शासनाच्या तृप्ती सांडभोर या अधिकारी आल्या आहेत. मुळात त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी राखीव असणाऱ्या पदावर प्रतिनियुक्तीवर आल्या आहेत. त्यातही त्यांनी महापालिकेत पदभार स्वीकारताच अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांच्या तिसऱ्या मजल्यावरील दालनावर अधिकार सांगितला असून त्या दालनातून अतिरिक्त आयुक्तपदाचा त्या कारभार पाहणार आहेत. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या दालनावर अतिरिक्त आयुक्तांचे अतिक्रमण केल्याने महापालिका वर्तुळात चर्चा रंगली होती.
”महापालिकेत अतिरिक्त आयुक्त क्रमांक एक आणि दोन ही दोन पदे शासनाकडून प्रतिनियुक्तीवर नियुक्त केली जातात. तर अतिरिक्त आयुक्त क्रमांक तीनचे पद हे महापालिका आस्थापनेवरील अधिकाऱ्यांसाठी पदोन्नतीसाठी आरक्षित आहे. मात्र, त्या एकमेव जागेवरही शासनाने प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. त्यास पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने विरोध दर्शविला आहे. महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. महापालिका अधिकाऱ्यास समकक्ष पदावर १० वर्षे सेवा पूर्ण असलेला अनुभव असावा. म्हणून अनुभवाच्या अटीत बदल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.”












