न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२५) :- निगडी येथील भक्ती-शक्ती उड्डाणपूल श्रीकृष्ण मंदिराजवळ भगदाड पडले आहे. अंकुश चौक मार्गे निगडी भक्ती-शक्तीकडे जाताना उड्डाण पुलाला भगदाड पडल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. येथील रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने २०१९-२० साली भक्ती-शक्ती उड्डाणपूल हे काम बी. जी. शिर्के कंपनीला दिले. या कामासाठी ११० कोटी रुपये इतका प्रचंड खर्च करण्यात आला. कंपनीने नियोजित वेळेत काम केले नाही. महापालिकेने काम करण्यासाठी मुदतवाढ दिली. परंतु निकृष्ट दर्जाचे बांधकाम शिर्के कंपनीने केले असल्याचे दिसून येत आहे.
मागील वर्षीदेखील भक्ती-शक्ती उड्डाण पुलाला भगदाड पडले होते. त्यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने भक्ती शक्ती उड्डाणपूल स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट जाहीर करून बी. जी. शिर्के कंपनी यांच्या विरोधात रस्त्यावर भगदाड पडले म्हणून फौजदारी गुन्हा नोंद करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, तसेच ज्या ठिकाणी रस्त्यावर भगदाड पडले आहे ते ताबडतोब बुजून त्या ठिकाणी रस्ता व्यवस्थित करून देण्यात यावा. जेणेकरून भविष्यात उड्डाणपूल ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ताबडतोब दखल घेऊन बी. जी. शिर्के कंपनी यांच्याविरोधात कडक कारवाई, अशी मागणी भाजपा शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे.












