- पालिकेच्या शिक्षण विभागाकडून धडक कारवाई; शाळेला ठोकले सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. जुलै. २०२०) :- लॉकडाऊनमध्ये पालकांना वह्या पुस्तके खरेदी व फीसाठी आग्रह करण्यास बंदी असतानादेखील काही शाळा मनमानी करुन पालकांना वेठीस धरत आहेत. या अनुषंगाने निगडीतील ऑर्किड शाळेवर महापालिकेच्या शिक्षण विभागाने धडक कारवाई करीत शाळेला सील ठोकले आहे.
निगडी येथे ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल आहे. पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण या संस्थेत दिले जाते. करोना विषाणूच्या संक्रमणामुळे शाळा कधी सुरू होतील याबाबत शासन स्तरावर अद्याप निर्णय झाला नाही. सद्यः स्थितीत ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. ऑर्चिड शाळेतही ऑनलाइन शिक्षण सुरू होते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तके, वह्या घ्याव्यात असा आग्रह शाळा प्रशासनाचा होता. शाळेने कॅम्पसमध्येच दुकान थाटले होते. कॅम्पसमध्ये वह्या, पुस्तके, गणवेशांची विक्री केली जात होती. याबाबत पालकांनी महापालिकेच्या शिक्षण विभागात तक्रार केली होती. त्यावर प्रशासनाने शाळा प्रशासनाला नोटीस दिली होती. तसेच हा प्रकार त्वरित थांबवण्यास सांगितले होते. मात्र तरीही शाळा प्रशासनाने पुस्तकांची दुकानदारी सुरूच ठेवली होती. तसेच वार्षिक शुल्कासाठीही प्रशासनाकडून तगादा लावला होता. याबाबत अनेक पालकांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी व मेलद्वारे तक्रार केली होती.
याची गंभीर दखल घेत शिक्षण विभागातील अधिकारी विलास पाटील यांनी प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेवर कारवाई केली. कारवाई दरम्यान शाळेत मोठ्या प्रमाणावर पुस्तके व वह्या आढळून आल्या. यावेळी पालक जितेंद्र जैन, शिवाजी लोंढे, मिलिंद तेलवणे, अशोक कोराटकर व आदी पालक उपस्थित होते.
माझा मुलगा ऑर्किड शाळेमध्ये ६ वीत शिकत आहे. त्याची वार्षिक फी ९१ हजार रुपये आहे. शाळेकडुन त्यासाठी तगादा लावला जात आहे. शाळेतुनच पुस्तक वह्या खरेदी कराव्यात, असा आग्रह शाळा प्रशासन करीत आहे. त्यासाठी १० हजार रुपये फी घेतली आहे. त्यातही पुस्तके कमी आहेत. त्यामुळे आम्ही सर्व पालकांनी मिळुन पालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली. याची दखल घेत शाळेवर कारवाई करण्यात आली.
– सारीका कोरटकर, पालक असोसिएशन…