- नैराश्यातून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२०) :- पुण्यातील सहकारनगर भागात एका तरुणाला करोनाची लागण झाली होती. त्यामधून बरा झाल्यावर डॉक्टरांनी, त्याला होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला. मात्र, नैराश्यामध्ये गेलेल्या या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संदीप यांच्या वडिलांना देखील करोनाची लागण झाली होती. या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.
संदीप नागनाथ भोसले (वय ४५, रा. ओमकार पार्क, सहकारनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. काही दिवसांत संदीप यांना करोना झाल्याचा अहवाल आला. संदीप यांनी करोनावरील उपचार घेतले आणि डॉक्टरांनी त्यांना होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ते सोसायटीमधील घरी राहत होते. दरम्यान, संदीप यांचा भाऊ काल सकाळच्या सुमारास नाष्टा घेऊन पद्मावती येथील घरी आल्यावर, भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांना दिसून आले.
त्यानंतर रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. संदीप भोसले यांनी नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसानी व्यक्त केला आहे. या घटनेचा तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत.