न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२०) :- कु-हाडीने वार करून सराईत गुन्हेगाराचा भर चौकात खून केला. त्याच बदला घेण्यासाठी भावाने साथीदारांसह तरुणावर खुनी हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी पाच तासांत चार आरोपींना जेरबंद केले. पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ही कारवाई केली.
आकाश लक्ष्मीकांत वैरागर (वय २३), शुभम अनिल घाडगे (वय २२), शिवानंद बाळासाहेब पवार (वय २३), पुष्कर बाळासाहेब पवार (वय २३, सर्व रा. औधगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रशांत दिलीप दीक्षित (वय २२) असे खुनी हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर क्षितीज लक्ष्मीकांत वैरागर (वय २१) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, औध परिसरात दहशत असलेल्या कुख्यात रावण टोळीशी संबंध असलेला गुंड क्षितीज वैरागर याचा सराईत गुन्हेगार अनिकेत दिलीप दिक्षित (वय २३, रा. पोलीस लाईन, औध) याने सोमवारी (दि.१९) सायंकाळी भर चौकात कु-हाडीने वार करून निर्घृणपणे खून केला. चतुश्रृंगी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून अनिकेत दीक्षित याला अटक केली.
क्षितीज वैरागर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ आकाश वैरागर याने आरोपी अनिकेत याचा सख्खा भाऊ प्रशांत याच्यावर स्पायसर कॉलेज, औंध येथे मंगळवारी धारदार शस्त्राने वार करून खुनी हल्ला केला. त्यानंतर आरोपी पळून गेले. खुनी हल्ला करून पसार झालेले चार हल्लेखोर पिंपळे निलख येथे नदी पात्राजवळ लपून वसले आहेत, अशी माहिती पिपरी – चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस कर्मचारी प्रवीण दळे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले. भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा खुनी हल्ला केल्याचे आकाश वैरागर याने सांगितले. आरोपीना चतुश्रृंगी पोलिसांच्या ताब्यात दिले.