- वायसीएमच्या निरीक्षणात प्लाझ्माद्वारे रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२०) :- प्लाझ्मा थेरपीने बरे झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीत इतर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या तुलनेत जास्त वेगाने सुधारणा होत आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर काही दिवस थकवा, डोकेदुखी, भूक न लागणे, चक्कर येणे असा त्रास होतो. मात्र प्लाझ्मा थेरपीव्दारे बरे झालेल्या रुग्णांमध्ये या पैकी एकही लक्षण दिसत नसल्याचे वायसीएमच्या डॉक्टरांनी केलेल्या निरीक्षणात दिसून आले आहे.
वायसीएम रुग्णालयात दिडशे रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली आहे. त्यातील साधारण शंभर रुग्णांचे निरीक्षण केले असता, प्लाझ्मा दिल्यानंतर रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास अथवा परिणाम दिसून आलेला नाही. रुग्णांना बरे होण्यास फायदा झाला आहे. प्लाझ्मा थेरपीव्दारे बरे झालेल्या रुग्णांपैकी काही रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. तसेच रुग्णालयातून सोडल्यानंतर काही दिवस सतत त्यांच्याशी संपर्क ठेवला. त्यांच्या प्रकृतीची माहिती संकलीत करण्यात आली. यामध्ये शंभरहून अधिक वृद्ध रुग्णांचा समावेश होता.
वायसीएमच्या रक्तपेढीने आतापर्यंत १३०० हून अधिक रुग्णांना लाझ्मा बॅग दिल्या आहेत. पुणे विभागात प्लाझ्मा संकलन व वाटपात वायसीएम आघाडीवर आहे. कोरोनासाठी राखीव रुग्णालयांना राज्य शासनाने प्लाझ्मा थेरपी या उपचार – पध्दतीची सूचना केल्या होत्या. प्लाझ्मा थेरपी दिलेल्या रुग्णांवर कोणतेही दुष्पारिणाम झालेले दिसून आले नाहीत. श्वसनातील अडथळे, छातीतील कफ हे मुख्य आजार पूर्णपणे बरे झाल्याचे दिसून आले. रुग्णाला वेळेत प्लाझ्मा दिला तर प्रकृतीत सुधारणा होते. प्रकृती गंभीर झाल्यावर प्लाइमा दिला, तर त्याचा परिणाम कमी होण्याची शक्यता असते. रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्याने अनेक रुग्ण गंभीर झाले.