- आयुक्तांकडून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०२०) :- पिंपळे निलख येथील पवना नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाणी प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर रयत विद्यार्थी परिषदेचे दोन विद्यार्थी आमरण उपोषणासाठी बसले होते. ऊन, वारा, पावसाची तमा न करता कोणत्याही प्रकारचा निवारा न उभारता भर पावसात उपोषण सुरू होते.
अखेर चौथ्यादिवशी (दि. २३) सत्ताधाऱ्यांना जाग आली. स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे आणि नगरसेवक शीतल शिंदे यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेत, महापालिका मुख्यालयात चर्चेला बोलविले. चार दिवसांनंतर या उपोषणकर्त्यांची दखल घेतल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
दरम्यान उपोषणकर्ते युवक, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, नगरसेवक शीतल शिंदे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यात शुक्रवारी मुख्यालयात चर्चा झाली. उपोषणकर्त्यांच्या पाच मागण्यांनपैकी तीन मागण्या मान्य तर दोन मागण्यांची चौकशी करू असे लेखी आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
या होत्या उपोषणकर्त्यांच्या मागण्या…
– पिंपळे निलख येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम ठेकेदाराकडून काढून घ्यावे. ते महापालिकेने चालवावे
– पर्यावरण विभाग अभियंता संजय कुलकर्णी यांना निलंबित करावे
– याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
– मेसर्स विनय इंजिनिअरिंग प्रा. लि. या ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे.
– पिंपळे निलख जलशुद्धीकरण केंद्रात असणारी बायपासची लाइन पूर्णपणे उखडून टाकावी.