- टाटा कंपनी लसीकरण अभियानात होणार सहभागी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ एप्रिल २०२१) :- कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व कोविड लसीकरणाची संख्या वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेची विविध खासगी कंपन्यांसोबत नुकतीच बैठक झाली. या बैठकीत ‘सीएसआर’ अंतर्गत पालिकेला कोरोना उपाययोजनांसाठी मदत करण्याचे आश्वासन कंपन्यांनी दिले.
आयुक्त राजेश पाटील, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, केड्राई पुणे मेट्रोचे अनिल परांडे, सतीश अगरवाल, थरमॅक्स कंपनीचे सुनील भोसले, राहुल चौगुले, गरवारे कंपनीचे कमलकांत, टाटा मोटर्सचे रोहीत सरोज, एस. एस. भाले यांच्यासह ३० कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आयुक्त पाटील यांनी सध्याची कोरोना परिस्थिती, कंपन्यांकडून असलेल्या अपेक्षा, अधिकाधिक सेंटर्स सुरू करण्याची तयारीबाबत माहिती दिली. टाटा मोटर्स कंपनीने संपूर्ण लसीकरण अभियानात सहभागी होऊन अॅम्ब्युलन्स पुरविणे, लसीकरण केंद्र चालविणे, फ्रंटलाईन वर्कर्सची व्यवस्था करण्याच्या मदतीचे आश्वासन दिले. यासह लसीकरणाबाबत जनजागृती लघुउद्योग संघटनेकडून कंपन्यांमध्ये लसीकरण केंद्र चालू करावे, आवश्यक सुविधा, यंत्रणा उभारण्याची तयारी कंपन्यांनी दर्शविली आहे.