- राज्य सरकारकडून मूल्यवर्धित कर कमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२२) :- इंधनावरील केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला. त्यामुळे पेट्रोल साडेनऊ रुपयांनी, तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त आहे. यानंतर आता राज्य सरकारनेही पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित कर कमी केला आहे.
केंद्र शासनाने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने २२ मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे आहे. यामुळे वर्षाला सुमारे २५०० कोटी रुपयांचा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने कमी केलेल्या करामुळे पेट्रोल ११ रुपये ५८ पैशांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेलच्या दरात ८ रुपये ४४ पैशांनी स्वस्त झाले आहे.
व्हॅट कमी करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल १०९ रुपये २७ पैसे प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार आहे. पेट्रोल प्रतिलिटर २ रुपये ८ पैसे कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याशिवाय सरकारने डिझेलवर १ रुपये ४४ पैसे कमी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे डिझेल प्रति लिटर ९५ रुपये ८४ पैसे मिळणार आहे.