न्युज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १८ मार्च) :- पिंपरी-चिंचवड फिल्म क्लबच्या वतीने १६ व १७ मार्चला प्रथमच पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचे (शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल) आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात जगातील वेगवेगळ्या ५० देशांतून आलेल्या २४६ लघुचित्रपटांपैकी परीक्षकांनी निवडलेले ४१ लघुचित्रपट पाहण्याची संधी चित्रपटप्रेमींना मिळाली. त्याचे पारितोषिक वितरण रविवारी (१७ मार्च) झाले. यात प्रथम क्रमांक लिमिटलेस या राधेय तावरे दिग्दर्शित व पदुर या नवनाथ कांबळे दिग्दर्शित लघुपटाला विभागून देण्यात आला. तसेच द्वितीय क्रमांक देखील प्रदीप पवार दिग्दर्शित अंतेष्टी व जस्टीन ऑल्स्टीन दिग्दर्शित द व्हिजीटरला विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक असीफ मोयाल दिग्दर्शित जरीवाला आसमान या लघुपटाला देण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सुप्रिम मोशन पिक्चरचे संचालक राजेंद्र शिंदे, राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे सांस्कृतिक सल्लागार प्रवीण तुपे, परीक्षक मंडळापैकी डॉ. प्रदीप वाघमारे, सुदीप्तो आचार्य, डॉ. अनिल सपकाळ, संयोजक व पिंपरी-चिंचवड फिल्म क्लबचे प्रमुख अविनाश कांबीकर व दत्ता गुंड उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड फिल्म क्लबच्यावतीने देण्यात येणारा पहिला युवा प्रेरणा पुरस्कार २०१९ साठी राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर अविनाश अरुण यांना देण्यात आला. त्यांच्यावतीने हा पुरस्कार त्यांच्या आई – वडिलांनी स्वीकारला. अविनाश अरुण हे पिंपरी-चिंचवडमधील रहिवासी असून या क्षेत्रातील काम करणा-या व्यक्तींसाठी ते प्रेरणादायी तरुण व्यक्तिमत्व आहे. तसेच आगासवाडी या डॉक्युमेंट्रीचा विशेष पुरस्कार रमेश होलबोले यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ४१ लघुपटांमधून विविध तीन सर्वोत्कृष्ट लघुपट निवडण्यात आले. विशेष पुरस्कार द ड्रेनेज या लघुपटाला व स्पेशल ज्युरी अॅवॉर्ड आधा चांद तुम रखलो या लघुपटाला देण्यात आले.
याशिवाय इतर पुरस्कार पुढीलप्रमाणे – सर्वोत्कृष्ट अभिनय(स्त्री) – अनिता मोरे(पदुर), सर्वोत्कृष्ट अभिनय(पुरुष)(विभागून)- अथर्व कुलकर्णी(लिमिटलेस) व भरत शिंदे(पिपान्या) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – लघुपट इटर्निटी, सर्वोत्कृष्ट ध्वनिसंयोजन – चिरॉस्कुरा, सर्वोत्कृष्ट ध्वनीसंयोजन – गढूळ, सर्वोत्कृष्ट संपादन – पदुर, इटर्निटी, सर्वोत्कृष्ट पटकथा – क्लॅक, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – अन्तेष्टी.
पिंपरी चिंचवडमध्ये गुणवत्ता असलेले भरपूर तरुण आहेत. पण त्यांची योग्य ती दखल घेतली जात नाही. त्यांची म्हणावी तशी कदर होत नाही ही मनात खंत आहे, असे मत युवा राष्ट्रीय पारितोषिक विजेते चित्रपट दिग्दर्शक सुजय डहाके यांनी व्यक्त केले. तसेच दिग्दर्शक भाऊराव क-हाडे म्हणाले की, चित्रपट निर्मिती करण्याआधी लघुपट केल्यास त्यातून खूप चांगला अनुभव मिळतो. हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. यामुळे आपल्याला पुढे जाऊन किती मेहनत करायची आहे याचा अंदाज येतो. या स्पर्धेचे परीक्षण सुदीप्तो आचार्य, डॉ. अनिल सपकाळ व राज काजी यांनी केले.
प्रास्तविक संयोजक अविनाश कांबीकर यांनी केले. सूत्रसंचालन आशिष वड्डे व अमृता चिद्री यांनी केले. आभार संयोजक दत्ता गुंड यांनी मानले. पारितोषिक वितरण समारंभानंतर प्रथम क्रमांक विजेते लिमिटलेस व पदुर हे दोन्ही लघुपट दाखवण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या लघुपट महोत्सवाला दोन्ही दिवस मोठ्या संख्येने उपस्थित राहून रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला