न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२५) :- उन्हामुळे उसाचा रस, बर्फगोळ्यासह शीतपेयांना मागणी वाढली आहे. मात्र, रसात टाकलेला बर्फ व गोळ्यासाठी वापरलेल्या बर्फाची तपासणी ग्राहक करत नाहीत. रस किंवा गोळ्यात कुलिंगचा विषारी बर्फ तर नाही ना? असा प्रश्न एकदा स्वतःला विचारावा. त्यानंतर खात्री पटल्यावर रस किंवा बर्फ गोळा घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
लादीचा बर्फ हा अस्वच्छ पाण्यापासून तयार केला जातो. विशेषतः असा बर्फ शीतपेयाच्या बाटल्या थंड ठेवण्यासाठी वापरला जातो. आइसक्यूबचा बर्फ थंडपेयामध्ये वापरण्यासाठी योग्य असतो.
शेकडो रसवंतीगृह, ज्यूस सेंटर, शीतपेय सेंटर, बर्फगोळ्याच्या हातगाड्यांमुळे बर्फाला मोठी मागणी आहे. शहरात काही बर्फ उत्पादक आहेत. यात काही उत्पादक बर्फ जास्त वेळ टिकावा, यासाठी अमोनिया वायूचा वापर करतात. हा वायू शरीरासाठी घातक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. कुलिंगसाठीचा बर्फ खाण्यासाठी वापरला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
बर्फाचे दोन प्रकार आहेत. पांढरा बर्फ खाण्याचा असतो, तर निळा बर्फ शवागारासाठी वापरला जातो. नागरिकांनी रसवंतीगृहात जो बर्फ वापरतात त्याची अगोदर तपासणी करावी. तो घाण, अस्वच्छ कपड्यात, पोत्यात गुंडाळून तर ठेवला नाही, पिण्यासाठी जे पाणी वापरले जाते ते शुद्ध आहे का? ते कोणत्या ड्रममध्ये ठेवले आहे? बाटल्या स्वच्छ धुतल्या जातात का, याची आधी खात्री करावी,
अन्न व औषध प्रशासनाने रसवंतीगृहातील बर्फाची तपासणी सुरू केली आहे. तसेच ज्या फॅक्टरीत बर्फ तयार होतो, त्याचीही तपासणी केली जात आहे. नियमबाह्य काम करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्याऱ्यांनी दिला.